पायाखालचं गाव

Image
*पायाखालचं गाव* मराठी भाषा, मराठी व्याकरण याची गोडी मला अगदी शालेय वयापासुन. आमचे वडील किर्तनकार, भागवत धर्माची पताका खांद्यावर मिरविणारे शिलेदार त्यामुळे घरात आपसुक संत साहित्याची ग्रंथसंपदा, ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा, एकनाथ महाराजांचं भागवत व ईतर अनेक संताची लेखनसंपदा. वडिलांनी कधीच हाता कानाला पकडून शिकवलं नाही परंतु कळत-नकळत या गोष्टी मनाच्या गाभाऱ्यात झिरपत गेल्या. माझ्याइतकं किर्तनं नक्कीच कोणी ऐकलेली नसतील. शालेय पाठ्य पुस्तकात असणारं मराठीचं पुस्तक फार आवडायचं विषेशतः पहिल्या पानावर असणारा लेखकाचा फोटो व त्यांची माहिती मनाला भुरळ घालायची शिवाय मराठी विषय शिकविण्यासाठी लाभलेली शिक्षक मंडळी देखील उच्च प्रतीची होती. ष आणि श चा उच्चार कसा करायचा किंवा ण आणि न याविषयी काटेकोर असणारे कुलकर्णी सर अथवा एका लयीत कविता म्हणणारे कोटलवार सर असोत. पुढे दहावी नंतर माझ्या शिक्षणाचा प्रवाह बदलला आणि अभ्यासक्रमातुन मराठी हा विषय गायब झाला मात्र वाचणाची सवय तसुबरदेखील कमी झाली नाही. सुरुवातीच्या काळात व्रतपत्र वाचण एवढच मर्यादित होतं पुढे ते मासिक वाचनापर्यंत आलं. लोकसत्ता, चित्र...

सुखाचा घास

सुखाचा घास



रविवार म्हटलं तर आरामाचा दिवस, अंमळ उशिरा उठावं..निवांत आवरावं..कोणत्याही प्रकारची घाई नाही.बायकोची देखिल हीच ईच्छा. सोमवार ते शनिवार मुलांच्या शाळेसाठी पहाटे पाच पासुन राबणाऱ्या पत्नीला साहजिकच वाटु शकते की रविवारी थोडं उशिरा अंथरुनातुन जागं व्हावं..
एरवी सकाळी आठ वाजता उठणारे आम्ही रविवारी मात्र हमखास सहा वाजताच जागी होतो आता आम्ही उठलो म्हटल्या नंतर बायकोला देखील उठावच लागतं व रविवारची सुरुवातच मुळात वादाने सुरू होते. तिची पुर्णपणे खात्री आहे की तिला छळण्यासाठी म्हणुनच आम्ही मुद्दाम लवकर उठतो..

कालचा रविवार मात्र वेगळाच होता. पहाटे जाग आली आणि आळंदीला माऊलींच्या दर्शनासाठी जायचं असं वाटलं. होतं असं कधी कधी. एरवी कंपनीच्या कामानिमित्त आळंदी भागात जाणं होतच व गेल्यानंतर माऊलीचं दर्शन होतं. आज मात्र खास माऊलीच्या दर्शनाची ओढ लागली होती. मग काय शुभस्य शिघ्रम..भराभर आवरलं व स्प्लेंडरोबा वरती टांग मारुन आमची स्वारी आळंदीच्या दिशेने निघाली..

आळंदीला पोंहचताच आम्हाला समजलं की गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांचे पसायदान या विषयावरती व्याख्यान आहे. आमची स्वारी तडक फ्रुटवाले धर्मशाळेत हजर. व्याख्यान सुरुच होते. दोन तास चैतन्य महाराजांचे चैतन्यदायी विचार ऐकुन आमचे कान त्रप्त झाले व रविवार सार्थकी लागल्याचं समाधान मिळालं.

नेहमी प्रमाणे व्याख्यान आटोपुन महाराज व्यासपीठाखाली ऊतरले तर त्यांच्या भोवती स्त्री-पुरुषांचा गराडा, अशावेळी मी मुद्दाम मागेच थांबतो.
हळु हळु गर्दी ओसरली व महाराज निघण्यासाठी म्हणून बाहेर पडले मी याच संधीचा फायदा घेतला व महाराजांच्या पायावर डोके टेकविले. नेहमीप्रमाणे महाराजांनी कसे आहात??म्हणत विचारपूस केली एव्हाना आम्ही मुख्य दरवाजा पर्यंत पोंहचलो होतो. महाराज चप्पल घालण्यासाठी वाकले मात्र एक चप्पल बाजुला सरकलेली होती मी झटकन खाली वाकलो व महाराजांची चप्पल हातानीच सरळ केली. महाराजांना संकोचल्यासारखे वाटले मी मात्र खुष होतो कारण गुरुच्या चरणाच्या धुळीला स्पर्श करण्याचं भाग्य मला मिळालं होतं..

आमच्या मोठ्या भावाचं नुकतच लग्न झालेलं होतं, मी असेन पाचवी-सहावी ईयत्तेत. आमच्या वडिलांनी त्यांचे गुरु धुंडा महाराज देगलूरकर यांच्या पाद्यपुजेचा मोठा कार्यक्रम घेतला. महाराज, त्यांची पत्नी मायबाई व ईतर शिष्य आमच्या घरी आली होती फारच उत्साहाचं वातावरण होतं. महाराजांच्या आगमणाची वर्दी मिळाली अन् वडीलांनी उघड्या अंगानी देशमुख वाड्यापासुन महाराजा समोर लोटांगण घालण्यास सुरवात केली थेट आमच्या घरापर्यंत..नाकाचा शेंबुड पुसायला न येण्याचं माझं वय मात्र दादाचा मला फार राग आला कारण एकतर मला त्यात कमीपणा वाटला यापेक्षा उद्या आपल्या शाळेतील मुले आपली टवाळी करतील अशी भिती देखील वाटली. वय आणि समज अजाणतं असण्याचं ते वय कीतीसा विचार करणार.
आज अक्कल कमी असली तरी वय व अनुभव बर्यापैकी वाढलेलं आहे. गुरुला शरण जाणे याचा थोडा फार अर्थ मनाला स्पर्शुन जात आहे. वडिलांनी तरी स्वतः साठी थोडच मागीतलं असेल? त्यांनी देखील मुलांच्याच सुखाची मागणी केली असेल.

आज आम्ही जी कांही सुखाची चटणी-भाकर खात आहोत ते त्याच भक्तीच फळ आहे...
*नितीन कुलकर्णी*


---------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

अनुभव आणि आठवणी

अंतराळ