पायाखालचं गाव

*पायाखालचं गाव*

मराठी भाषा, मराठी व्याकरण याची गोडी मला अगदी शालेय वयापासुन. आमचे वडील किर्तनकार, भागवत धर्माची पताका खांद्यावर मिरविणारे शिलेदार त्यामुळे घरात आपसुक संत साहित्याची ग्रंथसंपदा, ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा, एकनाथ महाराजांचं भागवत व ईतर अनेक संताची लेखनसंपदा. वडिलांनी कधीच हाता कानाला पकडून शिकवलं नाही परंतु कळत-नकळत या गोष्टी मनाच्या गाभाऱ्यात झिरपत गेल्या. माझ्याइतकं किर्तनं नक्कीच कोणी ऐकलेली नसतील. शालेय पाठ्य पुस्तकात असणारं मराठीचं पुस्तक फार आवडायचं विषेशतः पहिल्या पानावर असणारा लेखकाचा फोटो व त्यांची माहिती मनाला भुरळ घालायची शिवाय मराठी विषय शिकविण्यासाठी लाभलेली शिक्षक मंडळी देखील उच्च प्रतीची होती. ष आणि श चा उच्चार कसा करायचा किंवा ण आणि न याविषयी काटेकोर असणारे कुलकर्णी सर अथवा एका लयीत कविता म्हणणारे कोटलवार सर असोत. पुढे दहावी नंतर माझ्या शिक्षणाचा प्रवाह बदलला आणि अभ्यासक्रमातुन मराठी हा विषय गायब झाला मात्र वाचणाची सवय तसुबरदेखील कमी झाली नाही. सुरुवातीच्या काळात व्रतपत्र वाचण एवढच मर्यादित होतं पुढे ते मासिक वाचनापर्यंत आलं. लोकसत्ता, चित्रलेखा, मार्मिक इत्यादी मासिकं मी वाचु लागलो हळूहळू माझी वाचनाची भुक वाढु लागली आणि मी शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर, द.मा.मिरासदार, जयवंत दळवी, गो.नी.दांडेकर ,रणजित देसाई यांचं लिखाण वाचु लागलो. यांनी माझ्या मनावर एवढं अधिराज्य केलेलं आहे की त्या काळात मी
दुसरं कांहिच वाचलं नाही. आत्मचरित्र वाचणे हा एक माझा छंद आज ही तो तसाच आहे. दया पवार, प्र.ई.सोनकांबळे, लक्ष्मण गायकवाड, कोल्हाट्याचं पोर, साधना आमटे, सुधीर फडके कीतीतरी आत्मचरित्र मी वाचलेली आहेत. बरं या सर्व वाचन काळात मला लिहीता हात नव्हता असे मुळीच नाही. काही किरकोळ जे सुचेल ते मी लिहीत होतो. परंतु कोणासमोर जाऊन मी लिहीतो, कविता करतो मला संधी द्या असं म्हणण्याची हिंमत तेव्हा नव्हती आणि आजदेखील नाही. नाही म्हणायला काही संपादकाकडे माझं काही लिखाण घेऊन मी गेलो होतो, त्यातली बरीचशी माझी मित्रच होती मात्र नेहमीप्रमाणे त्यांनी माझ्यासहित लिखाणाला केराची टोपली दाखविली तेव्हापासुन कानाला खडा लावला. पुढे हे सोशल मेडियाच माध्यम आलं. फेसबुक, व्हाट्सअप व ईतर माध्यमामुळे आपलं लिखाण डिजिटल रुपात प्रकाशित करण्याची संधी मिळाली. आता याचा फायदा मी न घेईन तर नवलच. येथे सुध्दा एक गोची झाली, सुरवातीच्या काळात बरीचशी व्हाट्सअप ग्रुप सख्या-चुलत नात्यातील, बरीचशी मला ओळखणारी, माझ्या आई-वडिलांना ओळखणारी होती. मी लिखाण पोष्ट केलं ही मंडळी तोंड वाकडं करु लागली, बरीचशी भुवया उडवत ,"हा कधीपासुन लिहु लागला" म्हणत चर्चा रंगवू लागली. काहीजणांनी एक-दोन वेळेस खाणाखुणा करीत अंगढे दाखविली मात्र त्यांना जेव्हा समजले की हा व्यावसायिक लेखण करतो तेव्हा ते देखील चिडीचुप झाले.
यात एक गोष्ट मात्र चांगली घडली अनेक माझे व्यावसायिक मित्र भेटले, ज्यांना मी लिहीतो हे माहित नव्हते व जे एक उत्तम वाचक आहेत हे मला माहित न्वहतो अशी मंडळी एका धाग्यात जोडली गेली. माझं लिखाण आवडीने ही मंडळी वाचत राहीली , त्यावर अभिप्राय देवू लागली. माझ्या पोटभरी व्यवसायामुळे कधी लिखाण होत नसेल तर मला मेसेज करुन किंवा प्रत्यक्ष फोन करुन सांगु लागली, "महाराज, कांहीतरी लिहा"
असाच एक वाचकप्रेमी मित्र परवा भेटला गप्पांच्या ओघात तो सहजच म्हणाला, " महाराज, तुम्ही लिहीता छान , पण तुम्हाला वाटत नाही का की तुमचं लिखाण एकसुरी होतय, कायम मी, माझे आई वडील, माझं गाव, माझं शेत या भोवतीच फिरत असत, याच्या बाहेर या आणि.काहीतरी भव्यदिव्य लिहा"!! एका दमात त्यानं आपलं मत मांडलं. त्याने दम भरला आणि माझा श्वास आतच अडकला. खरतर त्याची कांहिच चुक नव्हती. मी त्याला काही बोललो नाही मात्र माझा स्वतः शीच संवाद सुरु झाला. भव्यदिव्य म्हणजे तरी काय??

समुद्र तर सोडाच साधं बारमाही नदी नसणारं माझं गाव. परवा परवा पर्यंत समुद्र मी पाहिलेला नव्हता. सह्याद्री-हिमालयाच्या कडा सोडा साध्या टेकड्या नसणारं माझं गाव, रेल्वेचा थांगपत्ता नसलेलं माझं गाव, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी येथील शेती व.अहोरात्र मेहनत करणारा शेतकरी, मुलांच्या सुखासाठी अपार कष्ट उपसणारी माझी आई, भर पावसाळ्यात आडावर पोहर्याने पाणी शेंदणार्या माता माऊली. रखरखत ऊन अंगावर झेलत नांगर मारणारा शेतकरी अशीच माणसं मी पाहिली आहेत, त्यांची भाषा, जीवनशैली , सुख दु:ख याच्याशी मी एकरूप झालो आहे. शेवटी साहित्य म्हणजे तरी काय जे आपण अनुभवलं, भोगलं आणि उपभोगलं याचच तर प्रतिबिंब असतं हे सोडुन मी काहीच लिहु शकत नाही. याला कोणी भव्यदिव्य म्हणो वा आणखी काही..

माझ्या गावचा विस्तार देखील मर्यादित होता. आज गाव पायाखालचं राहिलेलं नाही.. उभं आडवं वाढलेलं आहे फक्त एक गोष्ट आहे आज मी त्यापासुन दुर असल्यामुळे पायखालचं गाव उशाशी घेऊन शांतपणे झोपु शकतो.

*नितीन कुलकर्णी*
पुणे
-------------------------------------------
मित्रांनो, या सत्रातील हा शेवटचा लेख, यानंतर तीन महीने मी लिहीणार नाही कारण तुमच्या प्रेमपूर्वक आग्रहामुळे आजपर्यंत सोशल मेडियावर प्रसिद्ध झालेल्या निवडक लेखांचे एक सुबक व आकर्षक पुस्तक तुमच्यासाठी प्रकाशित करावयाचे आहे. आपले प्रेम व जिव्हाळा कायमच माझ्यासोबत आहे.
प्रकाशनाचे आमंत्रण नक्की मिळेल.
--------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

अनुभव आणि आठवणी

अंतराळ

सुखाचा घास