पायाखालचं गाव
विशिष्ट वयात आपलं शिक्षण होतं. शालेय शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी सुटणारं आपलं गाव पुढेपुढे नौकरी-व्यवसायासाठी शहरात स्थिरावतं. लग्न, मुलेबाळे, पोटभरी या चिंता प्रत्येकालाच असतात मात्र गावशी असणारी नाळ काही तुटत नाही. गाव आपल्याला परत परत बोलावतच असतं कधी आनंदाच्या क्षणात तर कधी दु:खाच्या काळात.
ग्रामीण भाषा, गावंढळपणा घेऊन शहरात आपण येतो.अगदी सुरुवातीला याचं दडपण आपल्यावर नाही म्हटलं तरी थोड्या-फार प्रमाणात असतच. जसजसे आपण रुळत जातो तसतसं हा न्युनगंड कमी कमी होत जातो. दोन चार शहरी शब्द शिकतो आणि आपल्या अस्सल रांगडी भाषेला तिलांजली देण्याचा प्रयत्न करीत असतो. खरेतर आपण स्वत:लाच फसवित असतो. मोठी होणारी मुले, त्यांचं शिक्षण, त्यांचं विश्व हे वेगळच असतं आपण मात्र या ग्रामीण-शहरी द्वंद्वात अडकलेले असतो. तिकडची नाळ तर इकडचं वर्तमान आपल्याला सतत छळत रहातं. आपली पाय गावाकडे वळत असतात तर मन घराच्या कौलावर नाचत असतं.
गाव हे पिढीजात असतं आपल्या कीती पिढ्या येथे गेल्या हे आपणास देखिल ठाऊक नसते. अनेक नाती अगदी मातीपासून ते माणसापर्यंत येथे जोडलेली असतं. कालौघात अनेकजन आपणास पोरके करुन कालवश झालेली असतात. नवीन दमाची पिढी पुढे आलेली असते. काळाप्रमाणे गाव देखिल बदलेले असते. शहरात खेड्याचा म्हणुन बाजुस पडणारे आपण गावात मात्र शहराचा म्हणत बाजुला फेकल्या जातो. एकंदरीत आपली अवस्था "घर का ना घाटका अशीच होते"
मराठवाड्यातील अहमदपुर हे तालुक्याचे ठिकाण माझे गाव. परवा भाऊबीजेनिमित्त गावी जाण्याचा योग आला. बहीणी, भावजयी, काकी यांच्याकडुन ओवाळून घेताना मनावरचा शीण आपोआप गळुन पडला. थकत जाणारी माणसे पाहुन काळजी देखिल वाटली. गाव बदलतंय हे लगेच लक्षात आलं. खेड्यात फिरताना तेच लहानपणीचं द्रश्य दिसलं, ओरबडलेल्या चेहर्याची माणसे, खुराडागत घरे, तोच धोतरा शर्टाचा पेहराव, त्याच असुविधा तरी जीवन जगण्याची त्यांची उर्मी वाखाणण्याजोगी आहे.
बदललेली माणसे, बदलेलं गाव पहातच मी बसस्थानकावर आनंदी मनाने आलो तर बस उभी होतीच माझं ग्रामीण पार्सल शहरात पाठवण्यासाठी....
नितीन कुलकर्णी, पुणे
Comments
Post a Comment