*मातीच्या चुली*
*घरोघर मातीच्या चुली* ही म्हण अगदी लहानपणापासून ऐकतो आहे. शालेय जीवनात या म्हणीचा वाक्यात उपयोग करून बक्कळ मार्क देखिल कमावले आहेत मात्र त्या अजाणत्या वयाचा या म्हणीचा नेमका अर्थ कळलेलाच नव्हता कारण आमच्या घरी चुल असलीतरी इतर आजुबाजुच्या घरात स्टोव्ह किंवा ग्यास होता तर घरोघर मातीच्या चुली कशा काय बुवा हा प्रश्न बालसुलभ मनाला पडायचा.
माझी आई फार सुंदर चुल घालायची (चुल घालणे याचा सोपा अर्थ सुजाण वाचकांनी builder of चुल) असा घ्यावा. चांगल्या प्रतीची माती आई पाण्यात कालवायची व मुख्य चुल व त्यालाच चिटकून छोटीशी शेगडी बनवायची शेवटी लोखंडी उलथन्याने ती या गोळ्याला असा काही आकार द्यायची की पहातच रहावे.
आईचा चुल घालण्याचा महीमा गावात सर्वदूर पसरलेला होता. अनेकांच्या घरुन तिला बोलावणे यायचे ती देखिल आपल्या प्रपंचातुन वेळ मिळेल तशा प्रकारे विनामूल्य ही सेवा द्यायची.
गावातील पाच-सहा प्रतिष्ठित घरातुन आईला हक्काचे बोलावणे यायचे. ही घरे मला उगीचच श्रीमंतांची वाटायची का तर त्यांच्या घराला फरशी होती आमचं घर सडा-सारवणाचं..या आमच्या बालपणीच्या श्रीमंतीच्या कल्पना.
अशा घरातुन बोलावणे आले की आईच्या मागे-मागे मी हमखास जायचो. नीटनेटक्या साडीतील धीरगंभीर बायकांच कुतूहल मला कायमच वाटायचं शिवाय या बोलायच्या देखिल हळु आवाजात. " या मास्तरीन बाई" म्हणत आईचं स्वागत व्हायचं. वडील मास्तर असल्यामुळे मास्तरीन नसलेली माझी आई मास्तरीन बाई व्हायची. कोणी मास्तरीन बाई म्हटलं की आईच्या सुरकुतलेल्या अंगावर मुठभर मास चढायचं
*मला देखिल मास्तरीन होण्याची संधी आली होती मात्र तुझ्या बापामुळे ती हूकली* ही खंत शेवटपर्यंत ती माझ्याजवळ मांडायची. पुढे तीने आपल्या चार पैकी दोन मुलींना उत्तम शिक्षिका बनवून परिस्थितीचा वचपा काढला.
तर काय सांगत होतो या स्त्रियांना आईबद्दल प्रचंड आदर व स्नेह होता. चुल घालता घालता त्या आपली गार्हाणे आईसमोर मांडायच्या व आई त्यांना योग्य सल्ला द्यायची. नउवार लुगडं नेसणारी, कपाळावर मोठं कुंकु लावणारी , काळी-सावळी माझी आई, आठ लेकरांना व जमदग्नी अवतार असणारा आपला नवरा सांभाळत अनेक अडचणी झेलत संसाराचा गाडा ओढणारी माझी आई या श्रीमंत बायकांना सल्ले द्यायची तेव्हा मी एकटक तीच्याकडे पहातच रहायचो.गप्पा व चुल घालण्याचे काम झाले की दुधाचा चहा आमच्यासाठी यायचा मी तो अधाशीपणाने प्यायचो व आईच्या मागे घुटमळत घर गाठायचो.
पुण्या-मुंबईत खाद्यसंस्कृती फारच जोरात आहे. अनेक हॉटेल्स लोकांच्या जिभेचे चोचले पुरवित आहे. हल्ली मोठ्यातल्या मोठ्या हॉटेलमध्ये जा तिथे एक महागडी डिश असते *चुलीवरील भाकरी व बेसण*अगदी तीनशे, चारशे ते पाचशे रुपया पर्यंत याची किंमत असते लोकं देखील यावर तुटुन पडतात. दोन भाकरी, पिठलं व मिरचीचा ठेचा असं त्याचं साधारण स्वरूप असतं. मी मात्र कधीच हे जाणीवपूर्वक खाल्लं नाही कारण चुलीवरच्या भाकरी व पिठलं खातच आम्ही वाढलो.
आई खरोखर सुगरण होती परातीत भाकरीचे पिठ थापताना होणारा आवाज, तव्यावर भाकरी टाकल्यानंतर ती कीती शेकावी व नंतर चुलीपुढे उभी लावावी, कीतीही भाकरी करु द्या प्रत्येकीचा आकार सारखाच. पिठलं तर इतक्या प्रकारचं असायचं, तव्यावरच पिठलं वेगळं, ताकचं पिठलं वेगळं, पातळ पिठलं, पिठल्याच्या वड्या एक ना अनेक प्रकार बरं प्रत्येकाला वेगळी चव.
तव्यावरच पिठलं म्हणजे माझा जीव की प्राण. दादा नौकरी निमित्त सकाळीच बाहेर पडायचे. त्यांना डबा करतांना आई झटपट होणार म्हणून तव्यावरचं पिठलं करायची ते चुकुन आपल्या वाट्याला आले तर स्वर्गसुखच.
एवढी चव जिभेवर रेंगाळत असताना हॉटेल मधील भाकरी-पिठलं घेऊन ती चव मला घालवायची नाही.
न कळत्या वयात या म्हणीचा अर्थ कळला.नव्हता मात्र वाढतं वय व अनुभव, खालेल्ली अनेक टक्के-टोणपे व ईतरांच्या अडी अडचणी या म्हणीचा अर्थ सांगून जातात.
*नितीन कुलकर्णी*
drawbox(black);
drawbox (blue);
Comments
Post a Comment